अपंग व कर्णबधिर-निराधार मुलांची सेवा करणाऱ्या संस्थेला मदत करण्यासाठी व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
भाईंदर - भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील मच्छीमार कोळी समाजातील सुमारे ३६ वर्षांपासून उत्तन कोळीवड्यात नवशक्ती क्लब पातानबंदर तर्फे अपंग व कर्णबधिर-निराधार मुलांची सेवा करणाऱ्या संस्थानां मदत करण्यासाठी खेळविली जाणारी पावसाळी व्हॉलीबॉल स्पर्धा ह्यावर्षी दिनांक २५ जुलै २०२१ रोजी शासनाच्या नियमानुसार संपन्न झाली. ह्यावर्षी सुद्धा लॉकडाऊन असल्यामुळे उत्तन बाहेरील संघ गुजरात, सोलापूर, उस्मानाबाद,ठाणे तसेच मुंबईच्या संघांना स्पर्धेत स्थान न देता फक्त उत्तन कोळीवड्यातील स्थानिक संघामध्ये स्पर्धा खेळवण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पातान येथील नवशक्ती बॉईज संघाने प्रथम पारितोषिक तर सुपरस्टार संघ उत्तन ह्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. तसेच सामन्यातील उत्कृष्ठ खेळाडूचा मान अझीज शेख ह्यांनी पटकावला. ह्या स्पर्धेच्या मार्फत आयोजकातर्फे अपंग व कर्णबधिर-निराधार मुलांची सेवा करणाऱ्या हाऊस ऑफ चॅरिटी ( करुणा सदन उत्तन) ह्या संस्थेला ६०,०००/- रुपयांची मदत देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांनी त्या भागातील कोळी बांधवांनी कोरोनाची लस घ्यावी तसेच कोरोना नियमांचे पालन करून कोरोना नष्ट करण्यासाठी शासनास सहकार्य करावे अशी जनजागृती करण्यात आली.